गडचिरोली : हलक्या धानाची मळणी होऊन विक्री केली जात आहे. या धानाला जुन्या धानाच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपये भाव कमी मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये भाव देत आहेत. मात्र, काहीच पर्याय नसल्याने धान विकावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कमी, मध्यम व जास्त कालावधीचे धान, अशा तीन प्रकारच्या धानाची लागवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी कमी कालावधीच्या धानाची लागवड करतात. हे धान आता निघाले आहे. दिवाळी व इतर खर्च राहत असल्याने शेतकरी धान निघताच त्याची विक्री करतात.
जिल्ह्यात धान खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू झाले नाही. परिणामी, खासगी व्यापाऱ्याकडे धान विकल्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नाही. मात्र, धानाला अतिशय कमी भाव दिला जात आहे. जुन्या धानाला ३ हजार ३०० रुपये ते ३ हजार ४०० रुपये एवढा भाव दिला जात आहे. त्या तुलनेत नवीन धानाला अतिशय कमी भाव आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी घाई करू नये
• मागील वर्षीसुद्धा नवीन धानाला तीन हजार रुपये भाव मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी किमान २०० रुपये तरी अधिक भाव मिळाल्यास धानाचा भाव किमान ३ हजार २०० रुपये राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धानाची विक्री करण्यासाठी शेतकयांनी घाई करू नये, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.